आम्ही पण तुमचे बाप आहोत - चंद्रकांत पाटील
आम्ही पण तुमचे बाप आहोत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
पुणे : महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत असं म्हटलयं. पुणे महापालिकेच्या १६ प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ११ जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या.
चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या तर लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी टाकून ठरवण्यात आलेली एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली. मात्र चमत्कार होऊन सर्व १६ जागा आपल्याला मिळायला हव्या होत्या असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.
चंद्रकांत पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवारांना पुढची स्वप्नं पडतायत. पण त्यांनी त्यांची एनर्जी वाया घालवू नये आम्ही तुमचे बाप आहोत असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना म्हटले आहे. पुण्यात भाजपच्या कोथरुड मतदारसंघातील व्यापारी सेलच्या नियुक्त्या करण्यासाठी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते.