चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. तर भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष बनला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्षाने आणि उमेदवारांनी मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली. यातल्या चंद्रपूरच्या चिमूरमधल्या महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा झाली. अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी गाव तिथे बार, असं आश्वासन निवडणुकीवेळी दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाव तिथे बार असं आश्वासन देणाऱ्या वनिता राऊत यांचा चिमूरमधून पराभव झाला. वनिता राऊत यांना एकूण २८६ मतं मिळाली. या मतदारसंघातून भाजपच्या बंटी भांगडिया यांचा विजय झाला. तर काँग्रेसचे सतीश वार्जुकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. भांगडिया यांना ८७,१४६ तर वार्जुकरांना ७७,३९४ मतं मिळाली.



चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने दारुबंदी केली आहे. त्यामुळे वनिता राऊत यांनी निवडणुकीत दारुबंदी हटली पाहिजे, अशी मागणी केली होती. तसंच निवडून आल्यानंतर गाव तिथे बार सुरु करु. इतकच नाही तर बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु अशा घोषणा देखील त्यांनी केल्या होत्या. पण नागरिकांनी वनिता राऊत यांच्या या आश्वासनला केराची टोपली दाखवली आणि त्यांना नाकारलं.