मी मेल्यावर माझ्या पोराचे भविष्य नाही... मुलाची हत्या करत बापाचा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Chandrapur Crime : चंद्रपुरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुलाला संपवल्यानंतर बापानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर (Chandrapur Crime) जिल्ह्यातील मूल तालुक्यात घडलाय. आरोपी पित्याने त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या सर्व प्रकारामुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या राजोली येथील गणेश विठ्ठल चौधरी (31) हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता. हनुमान जयंतीच्या दिवशी गणेशने दारु प्यायली होती. मद्यधुंद अवस्थेत गणेशने पत्नीला मारहाण केल्याने ती माहेरी निघून गेली होती. त्यानंतर गणेश आपल्या लहान मुलासह घरात राहत होता. दरम्यान रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गणेशने दारूच्या नशेत मुलाचा गळा दाबुन खून केला.
हे सर्व कृत्य करण्याआधी गणेश चौधरीने एक चिठ्ठी लिहून याबाबत माफी मागितली होती. मुलाची हत्या केल्यानंतर गणेशने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पोलिसांनी जखमी गणेश चौधरीला उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
चिठ्ठीत काय लिहिलं आहे?
"नानाभाऊ मी मेल्यावर माझ्या पोराचे काही भविष्य नाही. त्यामुळे त्याला संपवत आहे. नंतर मीसुद्धा मरणार आहे. त्यामुळे आम्हा दोघा बापलेकांना एकाच छकुलीवर नेजो. गूड बाय, आय लव्ह यू प्रियांशू. पत्नी काजलला जिथं जायचं आहे तिथं जा म्हणा," असे गणेशने त्या चिठ्ठीमध्ये लिगिलं होतं. त्यानंतर गणेशने आत्महत्येचा प्रयत्न केला.
पुण्यात व्यावसायिकाची निर्घृण हत्या
बदनामी केल्याचा रागातून व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्रकार जुन्नर (Junnar) तालुक्यातील बेल्हे येथे घडला आहे. किशोर तांबे असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव असल्याचे समोर आले आहेत. किशोर तांबे 5 एप्रिलपासून बेपत्ता होते. शनिवारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदनामी केल्याच्या रागातून पांडुरंग जिजाबा तांबे व महेश गोरकनाथ कसाळ यांनी किशोर यांची हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला होता.