मित्रांचा वाद हत्येनं थांबला; चंद्रपुरात युवा सेना शहप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या
Chandrapur Crime News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहरप्रमुखाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात धारदार शस्त्राने वार करत शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शहर प्रमुखाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 30 वर्षीय शहर प्रमुखाचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मृत व्यक्तीच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची मोडतोड केली आहे.
चंद्रपूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे शहर प्रमुख शिवा वझरकरची निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली आहे. उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली. 30 वर्षीय वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर वझरकर याच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची जोरदार मोडतोड केली आहे.
पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आलाय. उबाठा गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मित्रांशी झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. उबाठा गटाने आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत वझरकर आणि आरोपी मित्रांमध्ये काही वाद झाला होता. तो वाद मिटवण्याकरता वझरकर हे मित्रांना भेटायला गेले होते. मात्र, त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला. या वादात शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. या हल्ल्यात शिवा वझरकर यांचा जागीच मृत्यू झाला. शिवा वझरकर यांचा परस्पर मित्रांमध्ये वाद झाला होता. हा वाद वझरकरकडून सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र झालेल्या मारहाणीत वझरकर यांचा मृत्यू झाला, असे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले.