शेतकऱ्याने फोन कट केला अन् गुन्हेगार सापडला; शेतात पुरलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं
Chandrapur Crime : चंद्रपुरात एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल चार दिवसांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना सापडला आहे. नातेवाईकांनीच चार दिवस मृताचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. एका शेतात या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना सापडला.
Chandrapur Crime : चंद्रपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूरात तरुणाच्या वेदनादायक मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात टाकलेल्या उघड्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पीडिताच्या मृत्यूनंतर शेतमालकाने घाबरुन शेतातच मृतदेह लपवला होता. यानंतर शेतकरी काहीच घडलं नसल्यासारखे राहू लागला. दुसरीकडे, कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात मृत त्या व्यक्तीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोध सुरु असतानाच कुटुंबियांनीही मृताचा शोध सुरुच ठेवला होता. अखेर 4 दिवसांनंतर या संपूर्ण प्रकरणावरून उलघडा झाला आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी शेतमालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हा सगळा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तोहगाव इथं घडला. गिरीधर धोटे नावाच्या शेतकऱ्याने शेतात वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून विद्युत तारा लावल्या होत्या. रात्री अंधारामुळे 45 वर्षीय पत्रु वालसू टेकाम यांना तारेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रभर मयत पत्रू टेकाम घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरु केला.
मात्र मृताचे नातेवाईक पोलिसांच्या तपासावर समाधानी नव्हते. त्यामुळे मृतकाच्या नातेवाईकांनी स्वतःच पत्रुचा शोध सुरू केला. पत्रु हे रोज ज्या रस्त्याने कामावर जायचे त्याच मार्गावरून कुटुंबीयांनी शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात बारकाईने शोध सुरू केला. पत्रु यांचे नातेवाईक रवींद्र कोडापे यांनी शोध घेत असताना गिरीधर धोटे यांच्या शेतात शोधायचे राहिले असे सांगितले. त्यानंतर ते नदीजवळ गेले व तेथून परत येताना या धोटे यांच्या शेताची त्यांनी कसून तपासणी केली. त्यावेळी शेतमालक गिरीधर व त्याची पत्नी पाणी देत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी रवींद्र कोडापे यांनी धोडे यांना फोन केला. पण त्यांनी मुद्दाम फोन उचलला नाही. यामुळे धोडे यांच्यावर कुटुंबियांचा संशय बळावला. त्यामुळे पत्रु यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या शेताची पुन्हा तपासणी केली.
तपास करत असताना त्यांना शेतात एक भरलेला खड्डा दिसला. खड्डा भरल्यानंतर जमिनीवर मातीचा ढिगारा दिसत होता आणि तेथे काही किडेही दिसले. त्यामुळे पत्रु यांच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खड्डा खोदला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
दरम्यान, याप्रकरणी 20 तारखेला पोलीस ठाण्याच्या कक्षात तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान 23 नोव्हेंबर रोजी एका तरुणाचा मृतदेह शेतात पुरल्याची माहिती पोलीस पाटील यांच्यामार्फत पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. हा मृतदेह पत्रू टेकामचा असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.