`आनंदाचा शिधासोबत मी बिअर, व्हिस्की मोफत देईन`; महाराष्ट्रातील महिला उमेदवाराचे अजब आश्वासन
Chandrapur Lok Sabha : चंद्रपुरात लोकसभेच्या महिला उमेदवाराने आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानातून दारू -बियर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला उमेदवाराने दिलेल्या या अनोख्या आश्वासनाची चर्चा लोकसभा निवडणुकीत सुरु आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. 19 एप्रिल रोजी म्हणजे पहिल्या टप्प्यात चंद्रपूरात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान उमेदवार सामान्यतः अनेक विकास कामे करण्याचे आश्वासन देत असतात. मात्र चंद्रपूरातील एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी येथे राहणाऱ्या वनिता राऊत यांनी हे अनोखं आश्वासन दिलं आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 15 उमेदवारांमधील एक आहेत. वनिता राऊत यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार झाल्यास त्यांच्या आश्वासनांच्या यादीत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधासह दारू व बियरची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासोबतच बेरोजगार युवकांना दारूचे परवाने वितरित करण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
याआधी वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवत मद्याविषयीची आपली आश्वासने लोकांपुढे ठेवली होती. मात्र त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. देशाचे भाग्य ठरवणारी निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक. देशाशी निगडित जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर उमेदवार सभा - मैदान गाजवत असतात. मात्र वनिता राऊत यांनी दिलेल्या आश्वासनांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगली रंगली आहे.
दारिद्र्य रेषेखाली लोकांना बिअर, व्हिस्की मिळावी - वनिता राऊत
"मागच्या विधानसभा निवडणुकीत मी चिमूर मतदारसंघातून उभी होती. दारुचा यासाठी घेतला कारण चंद्रपूरात बंदी आहे आणि नागपुरात नाही. चंद्रपूरच्या लोकांनी कोणतं पाप केलं आहे. चंद्रपूरचे लोक कायदेशीर मार्गाने दारु पिऊ शकत नाही आणि नागपुरातील पिऊ शकतात. त्यासाठी मी चंद्रपुरातून दारु बंदी हटवण्याचा विषय मांडला होता. दारुबंदी हटवण्यात आली आहे पण माझे जे काही मुद्दे राहिले होते ते म्हणजे बिअर बार, बेरोजगारांना दारु विक्रीचे परवाने, जे दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना रेशन कार्डवर बिअर, व्हिस्की मिळावी. या राहिलेल्या मागण्या मी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे," असे वनिता राऊत यांनी म्हटलं.
आनंदाचा शिधासोबत बिअर द्या - वनिता राऊत
"सरकार सणासुदीला आनंदाचा शिधा देतं. त्या आनंदाच्या शिधासोबत सरकारने गोरगरिबांना भारी भारी ब्रॅण्डच्या बिअर, व्हिस्की द्याव्यात. जरी सरकारने हे नाही दिलं तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार बनवलं खरंच सांगते की माझ्या खासदार निधीतून दारु पिणाऱ्या गोरगरिब लोकांना आनंदाच्या शिधासोबत बिअर, व्हिस्की देण्याचे आश्वासन देत आहे," असेही वनिता राऊत म्हणाल्या.