Chandrapur Loksabha : चंद्रपुरात पुन्हा कमळ फुलणार? बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी मुनगंटीवार मैदानात; पाहा राजकीय समीकरण
Chandrapur Loksabha Election 2024 Political Scenario : येत्या 19 एप्रिलला चंद्रपूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणाराय.. भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्यातली ही लढत रंगतदार ठरणार आहे.. नेमकं काय आहे तिथलं राजकीय चित्र... पाहूया रिपोर्ट
Pratibha Dhanorkar vs Sudhir Mungantiwar : चंद्रपूर... नावात चंद्राची शीतलता असली तरी उन्हाळ्यात इथं सूर्यदेव आग ओकत असतो. आता तर लोकसभा निवडणुकीमुळं राजकीय वातावरण आणखीच तापलंय. एकीकडं शेती तर दुसरीकडं उद्योगांचा जिल्हा... घनदाट जंगल... ताडोबासारखा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प इथं आहे. शिवाय कोळसा खाणी, सिमेंट, ऊर्जा निर्मिती उद्योग ही चंद्रपूरची ओळख... मात्र याच उद्योगांमुळं चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. शेतीबहुल जनता असली तरी सिंचनाच्या सोयी नसल्यातच जमा आहेत. घनदाट जंगलामुळं वनाधारीत उद्योगांची वाढ आवश्यक होती. मात्र त्या आघाडीवर कासवगतीनं कारभार सुरूय. मानव-वन्य जीव संघर्ष तर इथल्या जनतेच्या पाचवीलाच पुजलाय. मुंबईसाठी थेट रेल्वेची मागणी अजून रूळावर आलेली नाही. सरकारी मेडिकल कॉलेजची 100 कोटींची इमारत पूर्ण झाली नसल्यानं रुग्णसेवेवर ताण पडतोय. (Chandrapur Loksabha Election 2024)
चंद्रपूरचं राजकीय गणित (Chandrapur Political Scenario)
चंद्रपूरमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र सध्या तिथं काँग्रेसचं राज्य आहे. 2009 मध्ये भाजपचे हंसराज अहिर इथून दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नरेश पुगलियांचा पराभव केला. 2014 मध्ये खासदारकीची हॅटट्रिक करताना त्यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंना तब्बल सव्वा दोन लाखांच्या मताधिक्यानं पाणी पाजलं. मात्र 2019 मध्ये मोदी लाटेतही हंसराज अहिर यांच्यासारख्या भाजपच्या दिग्गज केंद्रीय नेत्याला काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी लोळवलं. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या धानोरकरांनी अहिरांचा 44 हजार मतांनी पराभव केला. विधानसभेचा विचार केला तर इथं भाजपचे 3, काँग्रेसचे 2 तर 1 अपक्ष आमदार आहे.
गेल्यावेळी बाळू धानोरकरांच्या रुपानं महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार विजयी झाला होता. तर त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर वरोरा मतदारसंघातून आमदार झाल्या. 30 मे 2023 रोजी किडनी विकारानं बाळू धानोरकरांचं निधन झालं. आता त्यांच्या जागेवर काँग्रेसनं प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी दिलीय. खरं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आपली कन्या शिवानी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. भाजपनं आपला हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मैदानात उतरवलंय.
जातीचं राजकारण करून धानोरकरांनी गेल्यावेळी विजय मिळवल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी वंचितच्या उमेदवारानंही तब्बल लाखभर मतं घेतली होती. यंदा वंचितनं राजेश बेले यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाकडंही डोळेझाक करता येणार नाही.