आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : (Tadoba Tiger Video) भारतामध्ये असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प. दरवर्षी या व्याघ्रप्रकल्पाला मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देतात. जंगलाची सफर करतात आणि इथं मुक्तपणे वावरणाऱ्या वन्य जीवांना जवळून पाहतात. अशाच काही पर्यटकांना ताडोबाच्या या रानवाटांवर एक असं दृश्य पाहायला मिळालं ज्यामुळं एका क्षणाच त्यांना धडकी भरली, पण हा अनुभव मात्र त्यांच्या कायम स्मरणात राहील असाच होता. कारण, या मंडळींना पाहायला मिळालेली, दोन वाघांची झुंज! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी दोन वाघांमध्ये झालेली झुंज अनुभवली. प्रचंड मोठ्या आवाजात डरकाळ्या फोडत दोन्ही वाघ एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराच वेळ त्यांच्यात हे तुंबळ युद्ध सुरू होते. हे सर्व पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवलं. 


ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांचा सर्वोत्तम अधिवास. गेल्या  दशकापासून या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ याच व्याघ्रप्रकल्पात आहेत. देशातीलच नव्हे तर, परदेशातील पर्यटकांचा ओढाही या व्याघ्रप्रकल्पाकडे आहे. अशातच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बेलारा बफर झोनमध्ये दोन वाघांची झुंज आणि ही जंगल सफारी पर्यटकांसाठी आयुष्यभराचा अनुभव देणा ठरली. ताडोबाच्या जंगलामध्ये आतापर्यंत अनेक अशी एकाहून एक कमाल दृश्य पर्यटकांना पाहायला मिळाली आहेत. पण, वाघोबांची झुंज ही क्वचितच दिसणारी. त्यामुळं पर्यटकांसाठी हा अनुभव चौकटीबाहेरचाच होता. 



हेसुद्धा वाचा : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडचे निर्देश; 'या' व्यक्तीवर पक्षाला शाश्वती नाही 


तुम्ही कधी ताडोबा किंवा देशातील इतर कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे का? असा कोणता कमाल अनुभव तुम्हाला आला आहे का? असेल तर देशातील सर्वोत्तम व्याघ्रप्रकल्प आणि जंगल सफारीचं नाव कमेंटमध्ये कळवा.