चंद्रपूर जिल्ह्यात विषारी दारु जप्त, दोघे फरार
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जळगावमधून विषारी दारू विक्रीसाठी येत असल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केला आहे.
चंद्रपूर : राज्यात दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जळगावमधून विषारी दारू विक्रीसाठी येत असल्याचा गौप्यस्फोट पोलिसांनी केला आहे. २३ जूनला चंद्रपूरमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका मालवाहू ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे वीस लाखांची देशी दारू जप्त करण्यात आली.
दारु जप्त केल्यानंतर आरोपी साहेबराव देवरे याची चौकशी केली असता त्याने ही बनावट विषारी दारू जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका इसमाकडून घेतल्याची कबूली दिली. त्यानंतर आरोपी देवरेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पारोळ्यातील विषारी दारुची निर्मीती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विषारी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी रसायनं आणि यंत्र जप्त केलेत. दरम्यान यावेळी आरोपी भूषण ठाकरे आणि दीपक पाटील हे फरार झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.