आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपुरात (Chandrapur News) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत (Accident News) एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसाकलचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे आई वडिलांचासह एका चिमुकलीचा जागीच जीव गेला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन करत पोलिसांना जाब विचारला आहे. पोलिसांनी (Chandrapur Police) या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात निलेश वैद्य (32 वर्ष) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (26 वर्ष) आणि मुलगी मधू वैद्य (3 वर्ष) यांचा मृत्यू झालाय. धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे बल्लारपूर येथून घरी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते. अपघातामध्ये वैद्य कुटंब जागीच संपलं आहे. अपघात एवढा भीषण होता की मृतदेह चिरडलेल्या अवस्थेत रस्त्यावरच पडले होते.


दरम्यान, या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वेकोलीची कोळसा वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात यापूर्वीही झाले आहेत. मात्र प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. या अपघातानंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोखून कारवाई करण्याचे पलिसांकडून लेखी आश्वासन मागितले होते.


शिर्डीनजीक विद्यार्थांच्या खाजगी बसचा अपघात 


छत्रपती संभाजीनगर येथून भंडारदरा येथे सहलीसाठी गेलेल्या तापडीया कोचिंग इन्स्टीट्युटच्या विद्यार्थ्यांच्या बसला शिर्डीजवळ अपघात झाला. खाजगी बसचे समोरील टायर निखळल्याने हा भीषण अपघात घडला. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंप्री टोलनाक्यावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसच्या‌ समोरील उजव्या बाजूचा‌ टायर निखळला आणि बस थेट टोलनाक्याच्या दुभाजकावर जावून आदळली. या बसमध्ये 40 विद्यार्थी आणि चार ते पाच शिक्षक होते. अपघात झाल्यानंतर बसचा दरवाजा लॉक झाला मात्र बसची काच फुटल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी तेथून बाहेर पडत आपली सुटका केली. या अपघातात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.


दरम्यान स्थानिक युवकांनी तातडीने बचावकार्य करत उर्वरीत विद्यार्थीनींना बसमधून बाहेर काढले..लोणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलीस आणि स्थानिक युवकांनी पर्यांयी बसची उपलब्धता करून देत विद्यार्थी तसेच शिक्षकांना औरंगाबादकडे रवाना केले आहे. बंद पडलेला निर्मळ प्रिंपी येथील टोलनाका अपघाताला कारणीभुत ठरत असून तेथे लाईट आणि दुभाजकांवर रिफ्लेक्टर नसल्याने अनेक अपघात घडत असल्याच स्थानिकांनी म्हटंल आहे.