मुंबई : राज्यात झालेल्या सत्तातरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला ठाण्यामध्ये दौरा केला. यावेळी शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केली. त्यासोबतच ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आमदारांच्या घोडेबाजारावरून भाजपवर जोरदार टीका केली. अशातच पवारांच्या दौऱ्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना टोला लगावला आहे. (Chandrasekhar Bawankule on Sharad Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी याआधीही महाराष्ट्र पिंजुन काढला आहे, पण कधी ते ६० च्यावर गेले नाहीत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेत आले त्यावेळी त्यांनी कोणाला तरी फोडूनच आले असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जेव्हा ते सत्तेत होते त्यावेळी त्यांनी का दौरे केले नाहीत, असा सवाल महाराष्ट्राची जनता त्यांना विचारणार, असंही बावनकुळे म्हणाले. 


बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. मनसे आणि भाजपचं वैचारिक साम्य आहे, महाराष्ट्राचं आणि हिंदुत्त्वाचं रक्षण करण्यासाठी जे नेतृत्त्व राज्यात असेल त्यांना भेटण्यात काही अडचण नाही आणि आमचे परिवारिक संबंध असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं. 


दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections 2022) पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना महत्त्व आलं आहे.  राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर संध्याकाळी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आज बावनकुळेंच्या भेटीमुळे आता भाजप आणि मनसेत नेमकं शिजतंय काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.