नागपूर : शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे सरकारचे धाबे दणाणले असून आता सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.


जमिनीचं फेरमूल्यांकन करणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आठवड्यात जमिनीचं फेरमुल्यांकन केलं जाणार आहे. त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्क्म व्याजासह देणार असल्याचं आश्वासन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. तसेच, जमीन संपादनाची प्रक्रिया २००९ ते २०१५ पर्यंतची आहे. १९९ हेक्टर जमिनीचं पुन्हा मूल्यांकन केलं जाणार असल्याचं ते म्हणाले. 


सरकारकडून पुन्हा आश्वासन


धर्मा पाटिल यांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्याचं कुटुंबियांना त्यांनी आश्वासन दिल्याचं समजतं. त्यांना योग्य मोबदला मिळेल आणि अन्याय होणार नाही याची सरकार खबरदारी घेईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.


काय आहे प्रकरण?


मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यु झालाय. विष प्राशन केल्यानंतर पाटील यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालायात उपचार सुरु होते. रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयाच्या पाय-या झिजवणा-या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही, त्याचबरोबर जोपर्यंत त्यांना शहीद भूमिपुत्र शेतकरी असा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय.