कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
कोकण रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गवरुन धावणारी तुतारी एक्स्प्रेसच्या २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत वेळेत बदल करण्यात आला आहे. दादर-सावंतवाडी रोड-दादर गाडी दादर स्थानकातून रात्री ११.४५ वाजता सुटणारी गाडी आता रात्री १२.१० वाजता सुटणार आहे. गणेशोत्वाच्या काळात दादर-सावंतवाडी रोड या तुतारी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यासाठी दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेसला टू टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचा एक, स्लीपर क्लासचे ७, जनरल क्लासचे ८ तर सेकण्ड क्लासचे २ असे एकूण १९ कोच असणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरून रात्री १२.१० वाजता सुटणार आहे. ती सावंतवाडी रोडला दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासावेळी तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी ६.३० वाजता दादर स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर दाखल होईल.
आणखी सहा जादा गाड्या
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेकडून आणखी सहा विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे आणि सावंतवाडी रोड या स्थानकांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड , संगमेश्वर रोड , रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधूदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
पुणे-सावंतवाडी रोड- एलटीटी ( दोन फेऱ्या) ही गाडी २९ ऑगस्टला पुण्याहून रात्री १२.१० वाजता सुटणार असून पहाटे ४ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवाशांसाठी सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी ५.२० वाजता सुटणार असून एलटीटीला दुपारी ४.५० वाजता पोहोचणार आहे. पनवेल-सावंतवाडी रोड- पुणे ( दोन फेऱ्या) ही गाडी ३१ ऑगस्टला पनवेलहून मध्यरात्री १२.५५ वाजता सुटणार असून दुपारी २.१० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे.