रायगड : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४०व्या राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूरमध्ये लाखो शंभूभक्तांनी अभिवादनही केलं. या दिवसानिमित्त किल्ले रायगड आणि पुरंदरवरही सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी तुळापूरमध्ये उत्साहात पार पडला. संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूरमधील या राज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शंभू भक्त इथे आले होते. संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी यावेळी अभिवादन केलं. 


सकाळपासूनच तुळापूरमध्ये शंभूभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज्याभिषेक सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सत्यजीत तांबे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह स्थानिक आमदार अशोक पवार उपस्थित होते. 


छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावरही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गड देवता शिरकाईदेवी, जगदीश्वर आणि शिवसमाधीच्या पुजनासोबतच गडावर अभंग, पोवाडे सूर गुंजले. शिवाय मर्दानी खेळही खेळण्यात आले. येथे सकाळी शंभुराजांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात भगवे झेंडे, तलवारी नाचवत शिवप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शंभुराजांची ही पालखी मिरवणुक राजदरबारात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा साजरा झाला. महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या पाण्याने शंभुराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालण्यात आला. अभिषेकाचा हा मान वारकरी सांप्रदायातील दिग्गजांना देण्यात आला.


पुरंदर किल्ल्यावरही छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच किल्ल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अनेक शिवप्रेमी आणि नेते राज्याभिषेकासाठी उपस्थित होते.