Maharashtra Politics : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या भूमिकेमुळे छगन भुजबळ (chhagan bhujbal) महायुतीत एकटे पडलेत. शिंदे गट त्यांच्यावर संतापलाय तर खुद्द राष्ट्रवादीतूनच त्यांच्या भूमिकेला विरोध होतोय. अशातच छगन भुजबळांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. शिंदे समितीकडून आलेले आकडे आणि सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत आलेल्या आकडेवारीवर भुजबळांनी शंका उपस्थित करतानाच एक गंभीर आरोप केला आहे.


दोन दिवसांत नोंदींचा आकडा  वाढला कसा? भुजबळ यांचा सवाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. तर, ओबीसीतून नको अशी मागणी छगन भुजबळांनी केलीय. एका बाजूने कुणबी प्रमाणपत्र देत काही लोकांना घ्यायचं आणि दुसरीकडे ओबीसींविरोधात न्यायालयीन लढाईद्वारे बाहेर ढकलायचं. असा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरु असल्याचा आरोपही भुजबळांनी यावेळी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून नको. दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.  


ओबीसींना जे काही मिळतं ते मराठा समाजालाही मिळालं पाहिजे; जरांगे यांची मागणी


भुजबळांना जरांगे-पाटलांनीही उत्तर दिलंय. आम्ही कुणाचंच हिसकावत नाही, ओबीसीतलं आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेतोय असा पलटवार जरांगेंनी केलाय. ओबीसींना जे काही मिळतं ते मराठा समाजालाही मिळालं पाहिजे अशी मागणी जरांगेंनी केलीय. तेव्हा शिक्षण, नोकरीसह राजकीय आरक्षणाचीही मागणी जरांगेंनी अप्रत्यक्षपणे केलीय.. मात्र यावर भुजबळांनी थेट इशाराच दिलाय. मराठा समाजही आता ओबीसीमध्ये आला तर कुणालाच काही मिळणार नाही.. आणि ओबीसी संपतील असा इशारा भुजबळांनी दिलाय.


भुजबळ यांचे गंभीर आरोप


ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा, ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करा अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. याचिकेवरील सुनावणीदरम्यान छगन भुजबळ स्वत हजर होते. तेव्हा भुजबळांनी जरांगेंसह सरकारवरही गंभीर आरोप केले. मराठा आरक्षणावर छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत ते एकटे पडल्याचं चित्र आहे. त्यात भुजबळांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे शिंदे सरकार विरुद्ध भुजबळ असा संघर्ष नजीकच्या काळात आणखी पेटण्याची चिन्हं आहेत.


मराठा कुणबी प्रमाणपत्रावरुन छगन भुजबळांची आक्रमक भूमिका


मराठा कुणबी प्रमाणपत्रावरुन छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी उघडपणे भुजबळांवर टीका केली. त्यामुळे हा वाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उफाळून येण्याची शक्यता आहे.  भुजबळांच्या भूमिकेला विरोध करत शिंदे गटाने अजित पवारांनाच लक्ष घालण्याची मागणी केलीय. त्यासाठी शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक शंभुराज देसाईंच्या दालनात पार पडली. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक अजित पवार यांच्या दालनात पार पडली. त्यामुळे आता यावर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.