Anjali Damania On Chhagan Bhujbal: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु मराठा आरक्षणाला काही ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यातच आता भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या चर्चांना उधाण आलं आहे ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटमुळं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजली दमानिया यांनी केलेल्या एका राजकीय ट्विटमुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता दमानियांनी वर्तवली आहे. भुजबळांच्या प्रवेशाच्या शक्यतेवरुन भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत. 


अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप? असा सवाल अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. 


दरम्यान, अंजली दमानिया यांनी हे खळबळजनक ट्विट केल्यानंतर भुजबळांना यासंदर्भात विचारणा केली असता या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, 'मला अजून काहीच माहिती नाहीये त्यांना कशी माहिती मिळाली हे मला माहिती नाही,' असा टोला लगावत त्यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. 


'मला कोणत्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसीसाठी काम करत आहे. त्यामुळं मला नवीन काहीतरी पाहिजे असे काही नाहीये. असं काही प्रपोजल मला आले नाहीये. माझ्या पक्षात मी मंत्री आहे, माझी काहीच घुसमट वगैरे होत नाहीये,' असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. 



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करतानाच त्यांनी सरकारवरही निशाणा साधला होता. त्यामुळं छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करु  शकतात, अशी चर्चा रंगली होती. अंजली दमानिया यांनी केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. 


छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर टीका


मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, जरांगे मोठे नेते आहेत. ते काहीही करु शकतात. काल त्यांनी बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली. हे मला कधी सुटले नाही.