Chhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते. मग राज ठाकरे बाळासाहेबांसोबत असे का वागले? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी 'निवडणूक यात्रा' शोमध्ये छगन भुजबळांची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान भुजबळांनी आपली खदखद व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले अशी टीका राज ठाकरेंनी कळव्याच्या सभेत केली होती. यासंबंधी छगन भुजबळांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "हाच प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेंनाही विचारला पाहिजे. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे असं म्हणता, मग आता छगन भुजबळ तुमच्या मांडीला मांडी लावून का बसलेत असं विचारा". 


"तुम्ही तर रक्ताचे आहात ना. मला आठवतं मातोश्रीवर राज आला नाही तोपर्यंत जेवायचे नाहीत. अजून शाळेतून कसा आला नाही विचारायचे. मग तुम्ही असं का केलं? तुम्ही इकडेही असता, तिकडेही असता. तो मुद्दा लोकांना भावला अशातला काही भाग नाही. मी उद्धव ठाकरेंबरोबर बसलो तसा यांच्याबरोबरही बसलो आहे," असंही उत्तर छगन भुजबळांनी दिलं.


'अपमान झाल्याने लोकसभा निवडणुकीतून माघार'


छगन भुजबळ यांनी यावेळी माझा अपमान झाल्याने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दांत आपील नाराजी व्यक्त केल. अमित शाहांनी सांगितलं म्हणून निवडणुकीला तयार झालो. मात्र शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही, तो अपमान होता, असं भुजबळ म्हणाले आहेत. 


"मी काही मागितलं नव्हतं. मला उमेदवारी द्या म्हणून दारात येऊन पडू का? तुम्ही सांगितलं म्हणून तयार झालो होतो. निवडूनही आलो असतो. पण एक महिन्यानंतर अशी अवहेलना झाल्याचं वाटलं. सगळ्या जगाचं नाव जाहीर झाल्यानंतरही माझं नाव जाहीर होत नाही. म्हणजे तुम्हाला करायचं नाही. तुम्ही सांगितलं म्हणूनच तयार झालो होतो. तो अपमान समजून मी माघार घेतली," असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.