योगेश खरे, झी 24 तास नाशिक: गेले काही दिवस संतप्त असलेले छगन भुजबळ सध्या शांत झाले आहेत. अधिवेशन संपण्याची वाट बघत मुंबईला रवाना झालेत. मात्र एकूणच घेतलेल्या बंडाच्या पवित्र्याने त्यांची काहीशी राजकीय कोंडी झाल्याचं दिसतंय. भुजबळांचं राजकीय वजन कमी झालं का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. ओबीसी राजकारण करणारा आक्रमक चेहरा अशी छगन भुजबळांची ओळख. अजित पवारांनी मंत्रिपद न देऊन अन्याय केल्याचा आरोप भुजबळांनी केला. भुजबळ अधिवेशन सोडून नागपुरातून नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये त्यांनी समता परिषदेचे मेळावे घेतले. अजितदादा, सुनील तटकरेंना इशारे दिले. पण पुढं झालं काहीच नाही. अधिवेशनाची धावपळ संपल्यावर भुजबळांची समजूत काढू असं सांगून त्यांनी भुजबळांच्या इशाऱ्यांना फार महत्व देत नसल्याचे संकेत दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ नाही म्हणत असले तरी भुजबळही राष्ट्रवादीकडून कोणी नेता समजूत काढण्यासाठी येईल या अपेक्षेवर होते. पण राष्ट्रवादीकडून कोणीही भुजबळांची समजूत काढण्यासाठी नाशिकला फिरकला नाही. जेव्हा माध्यमांनी चर्चेसाठी कोणी येणार का?, त्यांच्याशी बोलणार का? असं विचारलं असता 'आधी त्यांना येऊ तर द्या', असंही भुजबळांनी सांगून आपण वाट पाहत असल्याचे संकेत दिले. अजित पवारांची साथ सोडायची तर भुजबळांसमोर काही पर्याय आहेत का? याचाही विचार करायला पाहिजे.


भुजबळांसमोर काय पर्याय?


महायुतीचा धर्माशी प्रतारणा होईल म्हणून भाजप भुजबळांना पक्षात घेणार नाही. एकनाथ शिंदेंशी छगन भुजबळांचं सख्य राहिलेलं नाही. शरद पवारांचा भुजबळांवर विश्वास राहिलेला नाही. शरद पवारांच्या लेखी भुजबळांची उपयुक्तताही राहिली नाही. उद्धव ठाकरेही भुजबळांना त्यांच्या पक्षात घेण्यास उत्सुक नाहीत.


ज्याच्यासोबत राहायचं त्याच्यासोबत गद्दारी करायची ही भुजबळांची सवय असल्याचा आरोप सुहास कांदेंनी केलाय. त्यामुळं भुजबळांनी स्वतःचीच राजकीय कोंडी करुन घेतल्याचं सुहास कांदे सांगतायत. भुजबळांनी बंडाचे निशाण फुंकलं असलं तरी भुजबळांचं टायमिंग चुकल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायेत.


राजकारणात कायम उपयुक्त असावं लागतं तरच त्या नेत्याला किंमत आहे. अवघ्या चार महिन्यापूर्वी भुजबळांची राजकीय उपयुक्तता होती. ही उपयुक्तता आता संपल्यात जमा आहे. त्यामुळंच भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ आल्याचं सांगण्यात येतंय.