चोरीला गेलं 85 तोळं, पोलिसांनी जप्त केलं 24 तोळं, पण मालकाला दिलं फक्त... संभाजीनगरमध्ये मोठी `हेराफेरी`
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 ऑगस्टला जबरी चोरी झाली होती. तीन चोरट्यांनी दुकानदारावर हल्ला करत ही चोरी केली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. चोरीच्या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज महानगर भागातील रांजणगावच्या मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये 8 ऑगस्टला तारखेला चोरी झाली होती. तीन चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत दुकानदारावर हल्ला केला होता. तसेच दुकानातील 85 तोळे सोनं, 3 किलो चांदी आणि पंधरा हजार रुपयांचा ऐवज तिघांनी लुटून नेला होता. मात्र आता सराफा दुकानातील सोन्याच्या चोरी प्रकरणात छत्रपती संभाजीनगर पोलिसांची (Chhatrapati Sambhaji Nagar Police) भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दोन दिवसांपूर्वी वाळूजच्या रांजणगाव मध्ये एका सराफा दुकानात चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकान मालकाला मारहाण करत सोनं चोरलं होतं. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी याप्रकरणात चोरट्यांना अटक देखील केली आहे. पोलिसांनी वीस तोळे सोनं चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती. रविवारी चोरी गेलेल्या सोन्यासह तीन आरोपींना अटक केल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.
मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. ज्या सराफा व्यापाऱ्यात दुकानातन सोने चोरीला गेले आहे त्या दुकान मालकाचा दावा वेगळा आहे. दुकान मालकाच्या दाव्यानुसार चोरट्यांनी 85 तोळे सोनं आणि 3 किलो चांदी चोरी केली होती. मात्र पोलिसांनी फक्त वीस तोळेच सोने चोरी गेल्याची तक्रार घेतली आहे. पोलीस चोरी झालेलं पूर्ण सोने सापडल्याचा दावा करत असले तरी माझं उर्वरित 65 तोळे सोनं आणि चांदी कुठे गेलं असा सवाल दुकान मालकाने विचारला आहे
महत्त्वाचं म्हणजे ज्या तक्रारीत पोलिसांनी वीस तोळे सोनं चोरी गेलो असं सांगितलं होतं त्याच कारवाईत पोलिसांनी 24 तोळे सोनं, आणि दीड किलो चांदी जप्त केली आहे. मग हे उर्वरित चार तोळे सोने कुणाचं असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसकीतडे तक्रारदार पोलिसांना वारंवार विनंती करतोय की त्याचे 85 तोळे सोने चोरीला गेले आहे. मात्र पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप दुकानदार करत आहे. त्यामुळे आता पोलिसांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ वाढत चाललं आहे. नक्की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगर मध्ये पोलिसांनीच गाडी चोरली असल्याचे प्रकरण झी 24 तासने उघड केले होतं. त्यातही पोलीस अजून चौकशीच करत आहेत. मात्र ठोस असं काहीच बाहेर आलेलं नाही. फक्त आरोप असलेल्या पोलिसांच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आता या सोने चोरीच्या घटनेतही पोलीस अडकले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
तक्रारदाराचे आरोप काय आहेत?
मूळ 85 तोळे सोन चोरी गेलं मात्र पोलिसांनी 20 तोळे सोन चोरीला गेल्याची तक्रार घेतली आहे. उर्वरित सोने चोरीची तक्रार घेतली नसल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे. पोलिसांनी पूर्ण सोने पकडल्याचा दावा केला तर उर्वरित 65 तोळे सोन नक्की गेलं असा सवालही दुकानदार विचारत आहे.