पोटाची खळगी भरायला निघालेल्या गोंधळ्यांवर काळाचा घाला; तरुणासह चिमुकल्याचा तळ्यात बुडून मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar : शेततळ्याजवळ खेळत असताना चिमुकला पाण्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी तरुणानेही उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडाला. या घटनेनंतर वैजापूरमध्ये शोककळा पसरली आहे
Chhatrapati Sambhaji Nagar : खेळता खेळता शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आठ वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. वैजापूरमध्ये (vaijapur) हा सर्व धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर वैजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आठ वर्षांच्या मुलाला वाचवणताना या तरुणाला देखील आपला जीव गमवावा लागला आहे. वैजापूर पोलीस ठाण्यात (Vaijapur Police) Aआकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पियुष विजय जीवडे (8) आणि कपिल किरण त्रिभुवन (18) अशी मृत्यांची नावे आहेत. कपिल हा आई-वडिलांना एकुलता एक होता. अभ्यासातही कपिल हुशार होता. सध्या कपिल अभियांत्रिकेच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता. यासोबत तो जागरण गोंधळात वाघ्याचे देखील काम करायचा. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्रिभुवन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैजापूर तालुक्याच्या बेलगाव शिवारात रविवारी हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व कलाकार कासली या गावाकडे निघाले होते. रस्त्यात बेलगाव शिवारात आराम करण्यासाठी ते थांबले होते. त्यावेळी कलाकारांसोबत असलेला पियुष जीवडे हा खेळता खेळता तिथे असलेल्या शेततळ्याजवळ गेला त्यात पडला. पियुषला पाण्यात पडलेले पाहून लोकांनी शेततळ्याजवळ गर्दी केली. मात्र कपिलने कसलाही विचार न करता थेट तळ्यामध्ये उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडाला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बाहेर बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच दोघांचाही मृत्यू झाला होता. वैजापूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
शेततळे पाहायल्या बापलेकाचा बुडून मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेततळे पाहण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा बुडून मृत्यू झाला होता. पुण्याच्या शिरुर भागात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला होता. मुलगा, वडील, नातू आणि सून असे चौघेही स्वतःच्या मालकीचे शेततळे पाहण्यासाठी गेले होते. यावेळी नातवाचा पाय घसल्याने मुलाने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघेही बुडू लागले. त्याचवेळी सुनेनेसुद्धा दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र तिलाही पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. मृत मुलाच्या भावाने पाण्यात उडी घेऊन महिलेचा जीव वाचवला. मात्र बापलेकाला वाचवण्यात यश आले नाही