भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील भव्य मंदिर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात संपन्न होत आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समस्त मराठी जनतेचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणीचे काम भिवंडी-वाडा रोडवरील दुगाड गावाजवळ मराडेपाडा इथं  सुरु आहे. छत्रपती शिवरायांचे हे महाराष्ट्रातील पहिलेच मंदिर आहे.


शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे दीड एकर परिसरात या भव्य मंदिराच्या उभारणीचं काम गेले दोन वर्षांपासून सुरु आहे. कोविड काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण अडचणींवर मात करत शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राज चौधरी आणि साईनाथ चौधरी या भावंडांनी मंदिराचे सुमारे 80 टक्के बांधकाम पूर्ण केलं आहे. 


मराठी जागृती मंच पानिपत, ठाणे जिल्हा यांच्यातर्फे विविध सामाजिक संघटनांच्या सहाकार्याने या मंदिराच्या निर्माणकार्याची माहिती घेण्यासाठी 4 जुलै रोजी स्थळपाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंदिर परिसरात देशी वृक्षांच्या रोपणाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडीचे तहसिलदार अधिक पाटील आणि पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांची विशेष उपस्थिती होती.