रायगड : छत्रपती.... शिवाजी महाराज... असे शब्द जरी उच्चारले तरी ऊर अभिमानानं दाटून येतो. एक वेगळीच भावना मनामनात स्फुरते आणि डोळ्यांसमोर उभी राहते दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या, स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि तुमच्या आमच्यासाठी दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराजांची किर्ती नेमकी किती उंच आहे, किती दूरवर ती पसरली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुळात कोणालाही याचं प्रमाण देण्याचीही आवश्यकता नाही. 


अचानकच छत्रपतींचा उल्लेख होण्यामागं कारण ठरतोय एक अवघ्या काही सेकंदांचा व्हिडीओ. 


अवकाळी पावसानं सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवलेली असताना सोशल मीडियावर मात्र एका व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील असल्याचं म्हटलं जात आहे. 


अनेकांनी व्हॉट्सअप स्टेटस, इन्स्टा स्टोरीमध्येही हा व्हिडीओ ठेवला होता. पाहता पाहता, ट्विटर, फेसबुकवरही या व्हिडीओनं सर्वांच्याच अंगावर काटा आणला. 


एकिकडे अवकाळी पाऊस जोरदार बरसत असतानाच दुसरीकडे रागयडावरील दृश्य पाहण्याजोगं होतं. 


सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या अविरत कोसळणाऱ्या सरी असतानाचे हे क्षण. जिथं राजसदरेवर पाऊस कोसळत असतानाच मेघडंबरीत असणारा महाराजांचा रुबाबदार बैठकीतील पुतळा शोभून दिसत होता. 



हे दृश्य पाहताना ते गरजणारे मेघही जणू राजांपुढं शरणागती पत्करुन बरसू लागले होते, याचीच अनुभूती झाली. एक वेगळीच भावना या व्हिडीओनं सर्वांच्याच मनात जागवली.