नागपूर: राज्यातील सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी उभयंतांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाली. तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत यांनी युती कायम राहावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे आता बुधवारी भाजपकडून शिवसेनेशी संवाद साधला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस उलटले तरीही राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटू शकलेली नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या अडीच-अडीच वर्षांच्या वाटणीसाठी आग्रही आहे. मात्र, भाजपकडून हा प्रस्ताव धुडकावण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेने अन्य पर्यायांचा विचार करत असल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेतली होती. 


'म्हणून तावडे राज्यपालांना भेटले असतील'; अजित पवारांचा टोला


या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धावपळ सुरु आहे. सोमवारी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्याचदिवशी संध्याकाळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली. यानंतर मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कोअर टीममधील नेत्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले होते. 


सत्तासंघर्ष : महाराष्ट्रात १९९९ सालची पुनरावृत्ती होणार?



मात्र, शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेगळ्या प्रस्तावाची गरज नसल्याचे सांगितले. जे ठरलेय त्याबाबत लेखी हमी दिल्याशिवाय भाजपशी कोणतीही चर्चा होणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यामुळे सत्तेची कोंडी कायम राहिली होती.