मुंबई : राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यातच सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांच्या भेटी वाढल्या आहेत. काल शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम राज्यपालांना भेटले. यानंतर आज भाजप नेते विनोद तावडे यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विनोद तावडेंच्या भेटीनंतर लगेचच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही राज्यपालांच्या निवासस्थानी गेले.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून विनोद तावडे यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटायला येण्याआधी तावडेंनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. सत्तास्थापनेच्या विविध पर्यायांबाबत राज्यपालांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र त्यावर तावडेंनी काहीही बोलण्यास नकार दिला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी तावडेंच्या भेटीवर जोरदार चिमटा काढला.
'तुम्ही पण पूर्वी भाजपमध्ये होतात, माझं तिकीट का कापलं? हे विचारायला विनोद तावडे आले असतील,' असा टोमणा अजित पवारांनी मारला. 'विनोद तावडे आता सध्याच्या विधानसभेचे सदस्यही नाहीत. जी व्यक्ती सदस्य नाही. जी व्यक्ती प्रमुख नेता होणारे त्याला मतही देऊ शकत नाही, ते इकडे येऊन काय चर्चा करणार आहेत? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटायला आले असते तर समजू शकलो असतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.