Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली असून, एकही जागा मिळवू शकली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कामगिरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सह्याद्रीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया दिली असून महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे सोबत आता आलं तर प्रयत्न करुन असं सांगितलं. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यावरही उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विधानसभेत फार यश मिळालं नाही, तसंच महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि महायुती एकत्र येईल का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की, "लोकसभेत त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदाही झाली. विधानसभेत आमच्या लक्षात आलं त्यांच्यासमोर प्रश्न आहे की, त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या लोकांनी निवडणुका लढल्याच नाहीत तर पक्ष चालणार कसा? आम्ही तीन पक्ष असल्याने आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला". 


निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'


 


पुढे ते म्हणाले, "इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढूनही त्यांना चांगली मतं मिळाली आहे. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ. त्यामुळे त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत आता आलं तर प्रयत्न करु". 


राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे. 


राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?


आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी  तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. 


2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.



पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. 


पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...


मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !