Devendra Fadnavis on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कडक कारवाई करण्यात येईल, गुंडांचं राज्य चालू देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, बीडच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य चालू देणार नाही. कोणालाही अशाप्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. त्यादृष्टीने तपास गतीशील केला आहे. त्यामुळेच त्याला शरणागती पत्करावी लागली आहे. हत्येतील जे आरोपी फरार आहेत त्यासाठी वेगवेगळ्या टीम कामी लागल्या आहेत. कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, सर्वांना शोधून काढू," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 


"संतोष देशमुख यांच्या भावाशी माझी फोनवरुन चर्चा झाली आहे. त्यांनाही मी काळजी करु नका, काही झालं तरी सर्व आरोपींना शोधून, ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत सगळी कारवाई पोलीस करतील असा विश्वास दिला आहे," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


पुढे ते म्हणाले, "कोणता आणि कसा गुन्हा दाखल होईल हे पोलीस सांगतील. पुराव्याच्या आधारे दोषींना सोडणार नाही. यासंबंधी पोलीस पत्रकार परिषद घेऊन सांगतील. जाणुनबुजून हे प्रकरण सीयआडीकडे देण्यात आलं आहे. त्यांना पूर्ण स्वायतत्ता देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव राहणार नाही".  


"कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे त्याच्या आधारे कारवाई करतील. त्यामुळे व्हिडीओत कोण काय म्हणतं हा विषय नाही. पुरावा असेल तर त्याला सोडलं जाणार नाही. मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना देऊ दे, संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी कारणूभीत लोकांना शिक्षा होणं गरजेचं आहे. काहींसाठी राजकारण महत्त्वाचं असून, ते त्यांना लखलाभ आहे. त्यांच्या राजकारणाने फार फायदा होईल असं वाटत नाही. मला कोणत्याही राजकीय वक्तव्यात जायचं नाही. त्यांनी राजकारण करत राहावं. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणारच आहोत," असा निर्धार त्यांनी व्यक केला आहे.