अमर काणे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आज रविवारी समृद्धी महामार्गाची(Samriddhi Highway) पाहणी करणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता नागपूर झिरो माईलपासून पाहणी दौरा सुरू होईल आणि सायंकाळी 5 वाजता शिर्डी इथं दौरा संपेल. येत्या 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात आढावा घेतला. तर शिंदे-फडणवीस उद्या प्रत्यक्ष महामार्गावर प्रवास करून पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे.


सकाळी 9.45 ला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स (महामार्गाचे सुरुवातीचे ठिकाण) येथून ते प्रवासाला सुरुवात करतील. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा प्रवास उद्या ते करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.


समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा असा हा महामार्ग आहे. यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण 120 मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.