Pune Crime News: पुण्यात भररस्त्यात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानं अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) थरारक घटना घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालाय. ही तरुणी या हल्ल्यातून थोडक्यात  बचावली, कारण तिच्या मदतीसाठी तीन तरुण धावून आले. हर्षद पाटील, लेशपाल जवळके आणि दिनेश मडावी या तिघांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं.या तिघांच्या धाडसाचे कौतुक होत असतानाच यातील दोन युवकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी वारी निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे सोलापुर दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तरुण मदत करण्याची घोषणा केली. मोठे धाडस दाखवून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या दोन युवकांना मंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी बक्षिस देणार असल्याची देखील घोषणा केली आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या दोन्ही तरुणांचं कौतूक केले आहे. 


धाडसी तरुणांचा पुण्यात सत्कार 


पुण्यातील तरुणीला जीवघेण्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कॉलेजला निघालेल्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी पुण्यात घडली होती. यावेळी लेशपाल जवळके आणि दिनेश मडावी या एमपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचवला. पुणे शहर भाजप तर्फे या धाडसी तरुणांचा प्रत्येकी 25 हजार रुपये आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला आहे. 


काय झालं नेमक?


लग्नाला नकार दिला म्हणून सदाशिव पेठेत शंतनू जाधव नावाच्या माथेफिरूनं त्याच्या मैत्रिणीवर कोयत्यानं हल्ला केला. वाचवा, वाचवा असा धावा करत ती तरुणी जीवाच्या आकांतानं पळत होती. माथेफिरू शंतनू तिच्यावर कोयत्याचे वार करणार, तोच तीन तरुण देवदूतासारखे धावून आले. दिनेश मढवी, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील. या तिघांनीही स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. या झटापटीत दिनेशला कोयता लागून किरकोळ जखमही झाली.


दिल्लीवाल्यांनो पुणेकरांकडून शिका


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या 29 मे रोजी एका 16 वर्षांच्या मुलीची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी साहिल खान साक्षी नावाच्या या मुलीवर भररस्त्यात चाकूनं 20 वेळा वार केले, तेव्हा लोक बाजूला उभं राहून केवळ बघ्याची भूमिका पार पाडत होते. लोकांच्या या वृत्तीवर दिनेशनं नाराजी बोलून दाखवली आणि दुसरीकडं मुलीचा जीव वाचल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं. तरुणीचा जीव वाचवणारे हे तिघेजण ख-या अर्थानं हिरो बनलेत. स्वतःच्या प्राणांची बाजी लावून तरुणीचे प्राण वाचवणा-या या तिघांचं समाजाकडून कौतुक होतं आहे. एमपीएससीचा अभ्यास करायला पुण्यात आलेल्या या तरुणांनी समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. केवळ दिल्लीकरांनीच नाही, तर सगळ्यांनीच यातून धडा घ्यायला हवा. भररस्त्यात तरुणीचा किंवा कुणाचाही जीव जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.