प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री, शिवसेनेचे मंत्री असे असताना शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर विकास निधीसाठी ढसाढसा  रडल्याची वेळ आली. ही घटना धुळ्यात घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा संदर्भातील योजनांचा आढावा ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला. शहरातील विश्राम गृहात मंत्री पाटील यांनी निवडक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.


यंदा महाराष्ट्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ४२ टँकर सुरु आहेत. बाकी कुठे तशी परिस्थिती नाही. आता नव्याने गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. या योजना मंजूर करत असताना सोलर उर्जेवर चालतील असे प्रस्ताव सादर करण्यात याव्यात अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या.


या बैठकीला धुळे शहरात शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका ज्योस्त्ना पाटील यांचे पती प्रफुल्ल पाटील हे उपस्थित होते. मंत्री महोदयांनी ही माहिती दिल्यानंतर प्रफुल्ल पाटील यांनी विकास निधीसाठी किती संघर्ष करावा लागतो हे सांगायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या भावनांचा बांध फुटला. 


प्रफुल्ल पाटील याना हुंदका फुटल्याचे पाहताच मंत्री पाटील यांनी त्यांची समजूत घालत थेट विकास निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, सत्ता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याला विकास निधीसाठी रडण्याची वेळ आल्याने ही घटना पाहणारे शिवसैनिकही चांगलेच बैचेन झाले होते.