जळगाव : आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावमधील या कार्यक्रमाचा फोटो उद्या पेपरमध्ये दिसेल. एकीकडे मी आहे, मध्ये पुरस्कार दाम्पत्य आणि त्या बाजूला शरद पवारसाहेब आहेत. महाविकास आघाडीत फूट पडली असे समजू नये. आम्ही विचार आणि कृती यांची सांगड घातली तर काही अशक्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. 



पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'आमचं बरं चाललंय' असा संदेश यानिमित्ताने दिला.



शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, आता राज्यात तुमचे सरकार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमुक्तीवरही मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला हमी दिली. कर्जमुक्तीची सुरुवात पुढील महिन्यात होईल. कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे. कर्जाच्या विळख्यातून शेतकऱ्याला कायमचं बाहेर काढणं हे आमचं लक्ष्य आहे. ते आम्ही पूर्ण करु असे मुख्यमंत्री म्हणालेत.