पुणे : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला आता स्वतः मुख्यमंत्र्यांकडूनच उत्तर मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ठाकरे हे पुण्यासह विभागातील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ७५हजारहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीकाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. इतकंच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात  पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.



या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या पुण्यात येत आहेत. एकूणच मुख्यमंत्र्यांचा दौरा कोरोना बरोबरच राजकीय दृष्टीकोनातून लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना अर्थात भाजपला उत्तर देणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. तसेच कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसात पुण्याला भेट देणार आहेत, असे स्पष्ट केले होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री पुणे शहराकडे निघतील. यावेळी पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील करोना संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांन संदर्भात बैठक घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. बैठकीत विभागिय आयुक्त तसेच पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी ५ वाजता मुंबईकडे निघतील.


पुणे महानगरपालिकेने कोरोनाचे वाढते प्रकरण थांबविण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू केले. या लॉकडॉऊनला भाजपने तीव्र विरोध केला. तसेच व्यापाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या लॉकडाऊनमध्ये अधिकाधिक चाचण्या घेण्यात येतील, असे पुणे महानगरपालिकेच्यावतीने सांगितले गेले. मात्र, अद्याप मोठ्या प्रमाणात चाचण्या झालेल्या नाहीत. दरम्यान, भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले की लॉकडाऊन हा कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्याचा मार्ग नाही. मुख्यमंत्री दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप केला होता.