विदर्भाचा मागासलेपणा दूर करणार,‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये `गोंडवाना थीम पार्क` (Gondwana theme park) उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे केली.
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती (Vidarbha) प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये 'गोंडवाना थीम पार्क' (Gondwana theme park) उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे केली.
महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या लोकार्पणाप्रसंगी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. तसेच या उद्यानातील जंबू अस्वलाच्या प्रतिकाचे अनावरण केल्यानंतर उद्यानाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान राजकुमार वाघाने, बिबट तसेच अस्वलाच्या पिल्लांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, दुष्यंत चतुर्वेदी, ॲड. आशिष जायस्वाल, नरेंद्र भोंडेकर, नितीन देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राज्याचे प्रधान वन मुख्य संरक्षक डॉ. एन. रामाबाबू, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर, मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध
मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहे. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. देशात आतापर्यंत नसेल अशा प्रकारचे सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान येथे तयार होईल. गोंडसमूह संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला या उद्यानात समर्पकपणे मांडण्यात येईल. नागपूरमध्ये लवकरच सिंगापूर सारखी 'नाईट सफारी 'सुरू होईल. त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.
'विदर्भाचे मागासलेपण धुऊन काढाणार'
गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे. गोसीखुर्दच्या पाण्याने विदर्भाचे मागासलेपण धुऊन काढायचे आहे. त्याआधी एक मे पर्यंत समृद्धी महामार्ग शिर्डी पर्यंत धावायला लागेल. लवकरच सुरजगड प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भाचा विकास सुरु राहील. एकसंघ विकास काय असतो हे आघाडी सरकार दाखवून देईल.
सफारी दरम्यान त्यांना 'गोरेवाडाचा राजकुमार' संबोधल्या गेलेल्या डौलदार वाघाचे दर्शन झाले. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, माणसाचा स्वभाव वाघासारखा विशाल असावा. विदर्भाच्या विकासाबाबत असाच विशाल दृष्टिकोन आपला आहे. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्ततेत केवळ संजय यांच्या हट्टापायी आज उद्घाटनाला आलो. मात्र हा प्रकल्प सुंदर असून तो निश्चित पूर्णत्वास जाईल. श्री. राठोड यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.
डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी पर्यटन हे विदर्भाचे 'ग्रोथ इंजिन' असल्याचे स्पष्ट केले. प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समर्पक असून ठाकरे कुटुंबियांनी आपल्या आजोळ असणाऱ्या विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. विदर्भात वनपर्यटन वन्यजीव पर्यटन सोबतच खान पर्यटनाला प्रचंड संधी आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी असणाऱ्या खाणीमध्ये हे पर्यटन सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना नवे आकर्षण निर्माण होईल. नागपुरातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास जावा. गोरेवाडा येथील दोन्ही प्रकल्प जोडण्यासाठी 'ओव्हरब्रीज ' करण्यात यावा. समृद्धीच्या मार्गाने विदर्भाचा विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दहा संरक्षित अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. नागपूर सभोवताल असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहे. त्यामुळे नागपूर ही खऱ्या अर्थाने देशाची वन राजधानी असून त्यादृष्टीने येथील प्रकल्पाला चालना देण्यात येत आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान निर्मितीसाठी वन विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना विकास, वन आणि पर्यावरण यांची सांगळ घालून साकारलेला हा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, वाघाचे संवर्धन करण्यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना राबविण्यात सुरुवात केली. विदर्भातील सात प्रकल्पामुळे वाघाच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. त्यामुळेच नागपूरला ‘टायगर कॅपीटल’ म्हूणन नवी ओळख मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल राहणाऱ्या आदिवासींना वनीकरणाच्या कामांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वन विभागाने आदिवासींना वनीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना यावेळी केली.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान या प्रकल्पाच्या नामकरणासंदर्भात आदिवासी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे येणाऱ्या पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गोंडवाना थीम पार्क हा प्रकल्पा प्राध्यांनाने पूर्ण करण्यास मंजूरी द्यावी, असे यावेळी नितीन राठोड यांनी सांगितले.