सिंधुदुर्गातलं चिपी विमानतळ अजून हवेतच
उदघाटन वर्ष पूर्ण पण पुन्हा विमान आलंच नाही...
विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : गेल्या वर्षी सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उदघाटन करण्यात आलं, गणपतीही विमानात बसून सिंधुदुर्गात पोहोचला. तेव्हा पुढच्या वर्षी विमानानंच गणपतीला जायचं, म्हणत मुंबईचे चाकरमानी खूष झाले होते. पण झालं भलतंच. कोकणी लोकांमध्ये सध्या याची अशी चर्चा आहे.
विमानात बसून गावाक जावचा भाग्य तुमकाच काय ता गावला. बाकी सगळे चाकरमानी चिपी कधी होतला, चिपी कधी होतला म्हणून चिपळे व्हाजवत बसले हत. पण कोकणच्या विमानतळावरचो कारभार काही हलाना. मागच्या वर्षी मोठी टिमकी वाजवत आणि ढोल बडवत गणपतीला आणल्यानी. आणि भाषणा तर अशी ठोकली की... नारायण... नारायण
ह्या ऐकल्यावर पुढच्या वर्षी आमका कोकण रेल्वेचो विषय नको, तुमच्या त्या कन्फर्म तिकटांका कांडा लागो... आता आम्ही आपले विमानानं गावाक जातलंव, म्हणून खुषीत हुताव....रवळनाथच पावलो... पण जळला मेला लक्षण...
मागच्या वर्षी गणपती इलो, तेच्यानंतर विमानच काय तर याक पाखरु पण विमानतळावरुन उडाला नाय... यंदा म्हणतंत... पुन्हा विमानातून गणपती आणूया
आमका एक प्रश्न पडलो हा.... या विमानातना दरवर्षी फक्त गणपती आणूचो हा की विमान चाकरमान्यांसाठी पण हा.. ? दरवर्षी गणपती तेवढो जातलो, चाकरमान्यांनी विमान काय स्वप्नातच बघायचा काय.