जमिनाला देवाचं नावं लागल्यानं ग्रामस्थांचा दुर्देवी फेरा
जमिनींवर श्रीदेव भारगव परशुराम देवस्थानचं नाव लागलं आणि इथुनच या ग्रामस्थांचा दुर्दैवी फेरा सुरू झाला.
रत्नागिरी : चिपळूणच्या पेढे आणि परशुराम या दोन गावांतून तब्बल पाच सरकारी प्रकल्प गेले, जमिनी संपादीत झाल्या मात्र मोबदला मिळालेला नाही आणि याला कारण आहे ते वहिवाटदार, कुळं आणि परशुराम देवस्थान यांच्यात वाद झालायं. १९५६ साली या जमिनी मूळ मालक म्हणून कुळांच्या नावे झाल्या मात्र १९६९ सालच्या एका जीआरने १९७२ साली इथल्या जमिनींवर श्रीदेव भारगव परशुराम देवस्थानचं नाव लागलं आणि इथुनच या ग्रामस्थांचा दुर्दैवी फेरा सुरू झाला.
सातबाऱ्यावर देवस्थानंच नावं
सात बा-यावर देवस्थानचं नाव लागल्यामुळे इथल्या ग्रामस्थांना ना कोणती बँक कर्ज देत. ना जमिनी गावक-यांना विकता येत ना साधं घर बांधता येत. यामुळे या दोन्ही गावचा विकास पूर्णपणे खुंटलाय..पूर्वीच्या असलेल्या सनदीच्या आधारेच ही नावं लागली असल्याचं देवस्थानचं म्हणणंय.
मोबदला कोणाला ?
प्रकल्पासाठी जमिनी दिल्याबद्दल मोबदला म्हणून २०० कोटींपेक्षा जास्त रक्कम सरकार दरबारी पडून आहे. त्यापोटी मिळणारा मोबदला नेमका द्यायाचा कुणाला हा प्रश्न प्रशासनाला पडलाय. त्यामुळे प्रशासनानंही हा निधी जिल्हा न्यायालयाच्या ताब्यात दिलाय. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जमिनी संपादीत झाल्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला. २००५ साली आलेल्या पुराची नुकसान भरपाईही या वादामुळे शेतक-यांना मिळाली नाहीयं.