मुंबई : "मुख्यमंत्री साहेब तुम्ही काहीही करा, मात्र आम्हाला मदत करा...माझं घर गेलंय...दुकान गेलंय...सगळंच गेलंय...मदतीसाठी फूल नाही किमान फुलाची पाकळी तरी द्या..." अंगावर काटा आणणारी आणि काळजाला भिडणारी ही वाक्यं आहेत ती टाहो फोडत रडणाऱ्या चिपळूणमधील व्यापारी महिलेची...साश्रू नयनांनी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची व्यथा ही महिला मुख्यमंत्र्यांना सांगत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली. यावेळी चिपळूणमध्ये बाजारपेठा आणि घरं पाण्याखाली गेली असल्याने जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी व्यापाऱ्याकडून नाराजी व्यक्त होताना दिसली. 


पाहणी दौऱ्यादरम्यान एका व्यापारी महिलेला भावना अनावर झाल्या. झालेल्या नुकसानाची माहिती देताना महिलेला रडू आवरता आलेलं नाही. "दुकान, घरं सगळंच पाण्याने वाहून नेलंय. मुख्यमंत्री साहेब आमदार खासदारांचा 2 महिन्यांचा पगार काढून कोकणाला मदत करा. आम्हाला नुसतं आश्वासन देऊन जाऊन नका," अशी कळकळीने या व्यापारी महिलेने मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.



दरम्यान ही व्यापारी महिला झी २४ तासशी बोलताना म्हणाली, पानगल्ली भागातील सगळ्याच्या घरांमध्ये 12 फूटांच्या वर पाणी होतं. सर्वांचं नुकसान झालेलं आहे. मुख्यमंत्री यांनी काहीतरी करू आम्हाला सहकार्य करावं. कोकणाने कधीही सरकारकडे काही मागितलं नाही. त्यामुळे यावेळी कुठूनही फंड जमा करून आम्हाला मदत करावी. आज आमच्यावर परिस्थिती इतकी बिकट आलीये की मी लोकांना दिलेले कपडे आज लोकांनी मला घालण्यासाठी दिलेले आहेत."


मुसळधार पावसाने चिपळूण जलमय झालं आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. अन्नधान्य, कपडे सुद्धा राहिले नाहीत. त्यामुळे खायला कण नाही आणि वापरायला कपडे नाहीत अशा परिस्थितीत नागरिक दिवस कसेबसे काढत आहे. अशातच पुढचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न इथल्या नुकसानग्रस्तांपुढे उभा ठाकलाय.


दरम्यान चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा व्यापाऱ्यांनी अडवला. मुख्यमंत्री गाडीतून पाहणी करणार होते, मात्र परिस्थिती पाहता त्यांनी खाली उतरून व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी घरोघरी जाऊन उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे.