`20 वर्ष बाप होता तुमचा, तेव्हा नव्हता का..`, `लाज वाटायला हवी` म्हणत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध संताप
Chitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पक्ष फोडीची सगळी मेडल दिली पाहिजेत अशी खोचक टिका करणारी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
Chitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांनी कठोर शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 'पक्ष फोडाफोडीचं आयुष्यभराचं गोल्ड मेडल शरद पवारांना द्यावं लागेल' अशा अर्थाचं एक व्यंगचित्र चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) वरुन शेअर करत टीका केली आहे. मात्र या टीकेवरुन अनेकांनी चित्रा वाघ यांना एकेकाळी तुम्ही ज्यांना बाप म्हणायचा त्यांच्यावर अशी टीका योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्ट खाली आक्षेप नोंदवणाऱ्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
चित्रा वाघ यांच्या पोस्टमध्ये काय?
'आयुष्यभर गोल्ड मेडल.. पक्ष फोडाफोडीचे!' असं म्हणत चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्वीटर हॅण्डल टॅग केलं आहे. त्यांनी या पोस्टला फोडाफोडाचे राजकारण असा हॅशटॅगही वापरला आहे. चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पदकदान समारंभातील पोडियमवर तिन्ही स्थानांवर शरद पवारच उभे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सर्वात डावीकडील पोडियमखाली "1978.. 40 आमदार घेऊन पहिल्यांदा काँग्रेस फोडली' असं लिहिलं आहे. राष्ट्रवादी स्थापन झाली त्या 1999 च्या वर्षाचा उल्लेख मधल्या पोडियमवर असून त्याखाली 'दुसऱ्यांदा काँग्रेस फोडली' असं लिहिलेलं आहे. या दोन्ही व्यंगचित्रांमध्ये शरद पवारांच्या हातात काँग्रेस पक्षाचं चिन्ह म्हणजेच हात दाखवण्यात आला आहे. तर सर्वात उजवीकडील पोडियमवर 1991 असं लिहून खाली '9 आमदार घेऊन शिवसेना फोडली' असा उल्लेख केला आहे. या चित्रात पवारांच्या हाती शिवसेनेचं धनुष्यबाण हे निशाणा आहे.
अनेकांनी केली टीका
अनेकांना शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर आधी त्यांच्याच पक्षात असलेल्या महिला नेत्याने केलेली टीका पटलेली नाही. एकाने या पोस्टवर कमेंट करताना, "मानलं की गोल्ड मेडल पवार साहेबांना पण सिल्वर मैडल तर शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार फोडून आणऱ्या नेत्याला पण भेटलं पाहिजे की नाही?" असा सवाल केला आहे. तसेच, "उत्तर जनता देईल 3 महिन्यात" असंही या व्यक्तीने म्हटलं आहे. "दिवसाढवळ्या पक्ष फोडणे आणि रात्री अपरात्री वेषांतर करून फोडावा लागणे,यात नक्कीच फरक आहे," असं स्वप्नील नकाटे नावाच्या तरुणाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.
"20 वर्ष बाप होता. लाज वाटायला हवी, तेव्हा नव्हता का पक्षफोड्या?" असा सवाल एकाने विचारला आहे. "देवा अशी पोरगी देण्यापेक्षा काहीच देऊ नको एखाद्याला," असं या व्यक्तीने म्हटलं आहे. तर दत्तप्रसाद टोपे यांनी "वा.. वा.. फोडाफोडीच मेडल साहेबांना, खाल्लेल्या ताटातच ओकायचं असल्या थर्ड क्लास गोष्टींच्या स्पर्धेतील ट्रीपल गोल्ड वाघ बाईंना," असं म्हटलं आहे. "बापाचे कार्टून पोस्ट करणारी पहिलीच लेक असेल, असो" असं सचिन साबणे यांनी म्हटलं आहे. महेंद्र तिवारी यांनी, "संधिसाधू ताई... कधीकाळी तुम्ही यांना बापमाणूस म्हणायच्या," असं म्हटलं आहे. चंद्रशेखर गोसावी यांनी, "कोण बोलतय आणि कोणाला… खरंच कळत नसेल आपण काय बोलतोय ते," अशी टीका केली आहे. "अहो गळा काढून ओरडणाऱ्या सूपर ताई पवार साहेब तर तुमचा बाप होता ना? याच बापाचा बोट धरून राजकारणात मोठ्या झालात आणि मग एवढ्या लवकरच तुमचा बापाबद्दल मत बद्दलल आश्चर्य आहे," असं प्रशांत भिसे यांनी म्हटलं आहे.
"शेवटी तुम्ही पण दाखवून दिले की भाजपा कडून राजकारणात मोठ पद मिळवायचे असेल तर आदरणीय पवार साहेबांवर टिका केल्या शिवाय मिळणार नाही," असं मनोज जाधव यांनी म्हटलं आहे.