Cidco Lottery 2024: घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मिळाला मुहूर्त मिळाला आहे. जानेवारी  2022 च्या  गृहनिर्माण योजने अंतर्गत तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील 3,322 घरांसाठी सिडकोने लॉटरी काढली होती.  या घराच्या सोडतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या  19  जुलै  या घराची  सोडत  काढण्यात येणार आहे. सुरुवातीला घरांच्या सोडतीसाठी 16 जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळं सोडतीची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं आता 19 जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडकोने 3,322 घरांची योजना जाहीर केली होती. त्यासाठी 16 एप्रिलला अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर 19 एप्रिलला संगणकीय सोडत करण्यात येणार होती. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळं ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 7 जूनचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र, नंतरही विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आता विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर म्हणजेच 12 जुलैनंतर सोडतीचा मुहूर्त निश्चित केला आहे. आता 19 जुलै रोजी सिडकोची सोडत होणार आहे. 


सिडको भवनाच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ही संगणकीय सोडत होणार आहे. त्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी 6 वाजता सोडतीत विजयी झालेल्या अर्जदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसंच, सोडतीत अयशस्वी झालेल्या अर्जदारांना 29 जुलैला अर्जासोबत भरलेल्या रकमेचा परतावा दिला जाणार असल्याचे सिडकोने म्हटलं आहे. 


सिडकोची घरे कुठे आहेत?


सिडकोकडून तळोजा आणि द्रोणागिरी येथे 3322 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी 61 घरे द्रोणागिरी नोड आणि 251 घरे तळोजा येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर द्रोणागिरीतील 374 आणि तळोजातील 2636 घरं सर्वसाधारण घटकांसाठी आहेत.