Fack Check : 50 हजारांसाठी एक बायको तीन नवरे, सरकारी मदतीवर नवरोबांचा डोळा
व्हायरल मेसेजमागचं सत्य काय ? या मेसेजने बीड जिल्ह्यात वादळ उठलं होतं
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : पैशांसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अशाच एका मेसेजनं बीड जिल्ह्यात वादळ उठलं आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्या बायकोच्या पैशांसाठी तीन तीन नवऱ्यांनी दावा ठोकलाय. लोकांमध्ये हा मेसेज चर्चेचा विषय ठरला होता. याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?
बायको मेली एकाची अन अनुदानासाठी दावा ठोकला तिघांनी..बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या 50 हजारांच्या अनुदानासाठी तीन जणांनी पती असल्याचा दावा ठोकलाय. विशेष म्हणजे या प्रकारामुळे प्रशासनालाही मोठा धक्का बसलाय असंही या मेसेजमध्ये म्हंटलंय.
व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
लोकांसाठी हा अतिशय कुतूहलाचा विषय आहे. खरंच एका महिलेच्या निधनानंतर तीन तीन नवऱ्यांनी दावा केलाय का? झी 24 तासनं या मेसेजमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.
बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून सानुग्रह अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. मात्र 50 हजारांसाठी तीन पतींनी दावा ठोकल्याचा कोणताही अर्ज आलेला नाही.
आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेज असत्य ठरलाय. त्यामुळे सोशल मीडियातल्या मॅसेजवर पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नका.