सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस
राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सांगली, सातारा, पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.
Maharashtra Rain Update : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तर, महाबळेश्वर खोऱ्यातही तुफना पर्जन्यवृष्टी झाली आहे. राज्यात अनेक जिह्यात धो धो पाऊस पडला. या पावासामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.
सांगली शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.मुसळधार पडलेल्या पावसामुळे सांगली शहरातले अनेक रस्ते जलमय झाले होते.अचानकपणे धुंवाधार अशा पावसाने हजेरी लावली आणि सुमारे तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्टेशन रोड, शिवाजी मंडई, झुलेलाल चौक, सिव्हिल चौक,मारुती चौक, वखार भाग आदी भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारकांची मोठी तारांबळ उडाली,तर पावसामुळे सांगलीकरांची दाणादाण उडाली.
महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस....
महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस पडला. पोलादपूर पायटा, कापडे गाव परिसराला पावसाने झोडपले. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर दक्षिण रायगडमध्ये पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडला.
संध्याकाळच्या सुमारास महाबळेश्वर घाटात तसेच रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील पायटा , कापडे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.दक्षिण रायगडात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने हजेरी लावली. महाड, माणगाव परिसरात पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या.
साता-यात अचानक मुसळधार पावसाची हजेरी
साता-यात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. गेल्या 10 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. उत्तर पुणे जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झालीये. आंबेगाव तालुक्यातील डोंगर माथ्यावर आणि मंचर शहरी भागात धो धो पाऊस बरसलाय... सुमारे एक तासाच्या धो धो पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालंय...
पुण्यात ऐन संध्याकाळी जोरदार पाऊस बरसला. हडपसर, हांडेवाडीमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचलं. तर घरी परतणा-या पुणेकरांना पावसाचा चांगलाच फटका बसला. अहमदनगरच्या जामखेड परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली... यामुळे शेतामध्ये पाणी साचले असून शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय... साकत, कोल्हेवाडी, कडभनवाडी या गावांना जोडणारा लेंडी नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला. तसंच नदीपलीकडे अडकलेल्या काही लोकांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं...
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे शेतातील उभ्या धान पिकांना मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 93 टक्के एवढा पाऊस झालाय. जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरलेत.
लातुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळतोय...जळकोटच्या वांजरवाड्यात शेताचा बांध फुटुन पाणी बाहेर येतंय...तर हडोळती - सावरगाव रस्त्यावरील ओढ्यालाही पूर आलाय...पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने बराच वेळ वाहतूक बंद होती.