हिंगोली : Maharashtra Rain : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.अतिमुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुरुंदा गावाला पुराचा वेढा असून वीज, मोबाईल नेटवर्क गायब आहे. त्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला आहे. तसेच वसमत तालुक्यातील नदी काठच्या घरांची पडझड झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वसमत तालुत्यातल्या कुरुंदा गावाला पुराचा मोठा फटका बसलाय. कुरुंदा गावासमोर नदीवर पूल आणि राज्य महामार्ग तयार करण्यात आलाय. या महामार्गाची उंची अधिक असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे कुरुंदा ग्रामपंचायतचीने हा राज्य महामार्ग फोडून तुंबलेल्या पाण्याला वाट करुन दिली. त्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला सुरूवात झालीय. 


कुरुंदा ही हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे शेकडो हळदीचे व्यापारी आहेत. पुराचं पाणी बाजारपेठेत शिरल्यामुळे हळद आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालंय. गावाला पुराचा तीन बाजूंनी वेढा बसला आहे. मात्र एक बाजू मोकळी राहिली असल्याने या बाजूने ग्रामस्थांचं इतरत्र स्थलांतर केलं जातंय. पुराच्या पाण्यात शेती, दुकानं, घरांचं नुकसान झालंय. मात्र जनावरं किती वाहून गेली याची आकडेवारी अजून आलेली नाही. मात्र या पुरात जीवितहानी झाल्याची माहिती नाही. 


 वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे 2016 पेक्षा भीषण परिस्थिती हिंगोलीत पाहायला मिळाली. गावात पाणी शिरल्याने लाईट गेली. यामुळे नागरिकांना अंधारातच जीव मुठीत घेवून रात्र काढावी लागली. गावातलं मोबाईल नेटवर्क गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या घरांचं प्रचंड नुकसान झाले आहे.


वसमत तालुक्यात कुरुंदा, सुकळी, कोठारी, सेलू, कुरुंदवाडी भागात मध्यरात्री दोन ते सकाळी पाच वाजेपर्यंत अति मुसळधार पाऊस झालाय. या ढगफुडीसदृश पावसाने कुरुंदा गावात पाणीच पाणी झाले आहे. नदीकाठची घरं, शेती पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे स्थिती गंभीर असल्याचं गावकरी सांगत आहेत.