मुख्यमंत्री फडणवीस `ब्लॅकमेलर` - पृथ्वीराज चव्हाण
`माझ्याकडे फाईल्स आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा` धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
सांगली : 'माझ्याकडे फाईल्स आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा' धक्कादायक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
मुख्यमंत्री फडणवीस हे गृहमंत्रीही आहेत... जर त्यांच्याकडे विरोधी नेत्यांविरुद्ध फाईल्स आहेत... तर ते गप्प का? आणि गुन्ह्याची माहिती असताना ती लपवून ठेवणं, हादेखील एक गुन्हाच आहे... आणि तो गुन्हा मुख्यमंत्री करत आहेत, असा सणसणाटी टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना लगावलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते.
कर्जमाफी करूच नये, अशी मुख्यमंत्र्यांची मानसिकता आहे... पण, नाईलाजानं मुख्यमंत्र्यांना ही घोषणा करावी लागली... सरकारच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरच्या 'नाटकाचा' आम्ही निषेध करतो, असं म्हणत शेतकरी संघटनांना पाठिंबा काढून घेण्याचं आवाहनच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
आपल्या कार्यकाळात झालेल्या कृषी उत्पन्नाच्या तुलनेत या सरकारच्या काळात कृषी उत्पन्न घटल्याचंही त्यांनी म्हटलंय. केवळ शेतीवरच उत्पन्न अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, मात्र अन्य उत्पन्न असणाऱ्यांना कर्जमाफी देण्यात येऊ नये... श्रीमंतांना कर्जमाफी देण्यात येऊ नये, असं म्हणत कर्जमाफीवर आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीय.
शिवाय, नोटाबंदीनंतर किती नोटा छापल्या त्याची आकडेवारी आरबीआय का उघड करत नाही? असा प्रश्न विचारत 'हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात आले की काय? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.