पालघर: आम्ही चर्चेला तयार असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ते सोमवारी पालघर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव आल्याचे वृत्त सपशेल फेटाळून लावले. मुख्यमंत्री अकारण हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत आहेत. मी चर्चेची दारे कधीच बंद केलेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून चर्चेसाठी पुढे यावे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मला आज दुपारी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा आंदोलन मागे घेण्यासाठी फोन आला होता. मात्र, कोणतेही ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही, हे मी त्यांना सांगितले. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांकडूनही चर्चेसाठीचा निरोप आला होता. त्यालादेखील मी नकार दिला. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत सरकारी बैठक बोलावली असती तर मी चर्चेचा कुठेही गेलो असतो. मात्र, सध्या आंदोलन सुरु असल्यामुळे मला अनौपचारिक चर्चेसाठी वेळ नाही. मला आंदोलनाच्यानिमित्ताने अनेक भागांमध्ये फिरावे लागेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना चर्चा करायची असल्यास त्यांनी तिकडे यावे. अकारण, हा मुद्दा प्रतिष्ठेचा करु नये, असेही राजू शेट्टींनी सांगितले.