मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर नाराज ?
भाजपाकडून देशमुखांचे आमदारकीचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकारमंत्री सुभाष देशमुखांवर नाराज असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे भाजपाकडून देशमुखांचे आमदारकीचे तिकीट कापले जाण्याची शक्यता निर्माण झाल्या आहेत. सुभाष देशमुख यांच्यामुळे पक्ष वारंवार अडचणीत येत असल्याने ही शक्यता अधिक गडद झाली आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची लोकमंगल संस्थेची अनेक वादग्रस्त प्रकरणं समोर येण्याची मालिका सुरूच आहे. तसेच कोल्हापूर, सांगलीतील पुराच्या काळात मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख म्हणून पूर्णत: अपयशी ठरल्यानं मुख्यमंत्र्यांचा राग ओढावून घेतल्याचे समोर येत आहे.
सुभाष देशमुखांचा काटा काढण्यासाठी सोलापूर दक्षिण मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळेच सोलापूर दक्षिण काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्याचे कळते.
कुणाला अंधारात ठेवून प्रवेश दिला जात नसून एकमेकांशी विचारविनिमय करून प्रवेश दिला जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी दिलीप मानेंच्या प्रवेशावर वक्तव्य केले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल ? यावरून सोलापुरातील राजकारण वळण घेणार आहे.