Eknath Shinde Ajit Pawar Fadnavis Bawankule Mahajan Travel In One Car: आपल्यापैकी अनेकजणांनी कधी ना कधी कारमध्ये क्षमतेपेक्षा अधिक संख्येने प्रवासी असताना प्रवास केला असणार. अगदी सार्वजनिक काळी-पिवळी जीप असो किंवा स्वत:ची कार असो कधी ना कधी आहेत त्या आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन तुम्हीही थोडं अॅडजेस्ट करुन प्रवास केला असणार. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही असाच प्रवास केला असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. या असल्या तडजोड केलेल्या प्रवासाचा कारमधील व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना 'गुवहाटी'ची आठवण करुन देत टोला लगावला आहे.


व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मुख्यमंत्री शिंदेंच्या कार चालकाने सेल्फी कॅमेरात काढण्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालकाच्या बाजूच्या सीटवर येऊन बसताना दिसतात. बसण्याआधी ते दाराजवळ उभे राहून समर्थकांना हात दाखवतात आणि स्थानापन्न होतात. दरम्यान शिंदे गाडीमध्ये बसण्याआधीच बॅक सीटवर मध्यभागी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसलेले दिसत आहेत. शिंदे कारमध्ये आल्यानंतर मागील बाजूच्या सीटवर बावनकुळेंच्या उजवीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या मागील रांगेतील विंडो सीट पकडतात. तर बावनकुळेंच्या डावीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार कारमध्ये शिरतात.


अजित पवार, बावनकुळे फोर्थ सीट


आता मागील सीटवर पूर्ण क्षमतेने म्हणजेच 3 सीटवर 3 नेते झाल्यानंतरही चालकाच्या मागील दारामधून भाजपाचे आमदार गिरीश महाजन कारमध्ये शिरतात. महाजन कारमध्ये शिरल्याने अजित पवार अजून उजवीकडे सरकतात. दरम्यान बावनकुळेही महाजनांना जागा करुन देण्यासाठी पुढे सरकून बसतात. त्यामुळे एका बाजूने फडणवीस दुसरीकडून महाजन अशा स्थितीत मध्यभागी बावनकुळे आणि अजित पवार फोर्थ सीटवर बसल्याप्रमाणे अगदी दाटीवाटीने बसलेले दिसतात. 


सुषमा अंधारेंनी लगावला टोला


सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ शेअर करताना सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. 'जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी,' अशी कॅप्शन दिली आहे.



हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, कधी शूट केला आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.