Eknath Shinde Raj Thackeray Alliance: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चांची तयारी जोमाने सुरु झाली आहे. जागा वाटपाच्या चर्चा, नेत्यांच्या गाठीभेटी आणि आढावा बैठकींचा सपाटा सुरु झाला आहे. अशातच गुरुवारी, 28 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेंच्या घरी भेट झाली. या भेटीनंतर शिंदे गटाकडून आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान केलं आहे. असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधील आणखीन एक भूकंप ठरेल असं म्हटलं जात आहे.


शिंदे-ठाकरे एकत्र येणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रसारमाध्यमांशी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. "जानेवारी महिना संपल्यानंतर लोकसभेच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी होतील त्यामध्ये राजसाहेब आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबांकडे गेलो तर त्यामध्ये चुकीचा अर्थ काढण्याचा काही संबंध येत नाही," असं शिरसाठ यांनी म्हटलं आहे. म्हणजेच भविष्यात लोकसभेच्या आधीच एकनाथ शिंदेंचा गट राज ठाकरेंसोबत किंवा राज ठाकरे शिंदे गटासोबत जाऊ शकतात असे स्पष्ट संकेत शिरसाठ यांनी दिले आहेत.


...तर 45+ जागा शक्य


शिरसाठ यांनी पुढे बोलताना सत्ताधाऱ्यांबरोबरच इतर पक्ष एकत्र आल्यास लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 हून अधिक जागा सहज जिंकता येईल असं म्हटलं आहे. "लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची एवढं आमचं उद्दीष्ट आहे. मग त्यात भाजपा, अजितदादांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली तर मला वाटतं 45+ चं जे टार्गेट आहे ते पूर्ण करता येईल असं मला वाटतं," असं मत शिरसाठ यांनी व्यक्त केलं आहे.


दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा


राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी 40 मिनिटं चर्चा केली. या चर्चेदरम्यान अगदी टोलनाक्यांसंदर्भातील मनसेच्या अहवालापासून ते राम मंदिराच्या सोहळ्याच्या वेळेस सेलिब्रेशनसंदर्भातील सर्वच गोष्टींबद्दल सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.


महाविकासआघाडीत बिघाडी?


एकीकडे सत्ताधाऱ्यांबरोबर मनसेलाही घेण्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आजच संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना उद्धव ठाकरे गट 23 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. मात्र 23 जागा उद्धव ठाकरे गटाला दिल्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला काय येणार असे प्रश्न महाविकास आघाडीतील नेतेच विचारत आहेत. त्यामुळे या जागा वाटपावरुन वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत.