एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' मध्ये केला आहे. झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनेक गौप्यस्फोट केले. 2022 ला सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असं त्यांनी सांगितलं. मात्र वेळ निघून गेली होती, असं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, हे सत्य असल्याचं सांगितलं आहे. मी खूप काही बोलू शकतो, पण बोलणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, "त्याच्यात सत्यता, वस्तुस्थिती आहे. आम्ही बाहेर गेलो तेव्हा त्यांनी तसे प्रयत्न केले. तुम्हाला मुख्यमंत्री करतो, पुन्हा या असं मलाही सांगितलं होतं. पण मी मुख्यमंत्री होण्यासाठी तसा निर्णय घेतला नव्हता. विचारांची फारकत झाली होती. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली जाते तेव्हा वैचारिक भूमिका घेऊन गेलो. त्यांनी दिल्लालाही फोन केला होता. तुम्ही त्यांना का घेताय, आम्ही सगळी शिवसेना घेऊन येतो असं ते म्हणाले होते. पण त्यांच्याक़डे शिवसेना राहिली नव्हती. 50 लोक माझ्यासोबत होते. फडणवीस जे बोलले आहेत त्यात सत्यता आहे. मी अजून खूप काही बोलू शकतो, पण बोलणार नाही". 


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?


उद्धव ठाकरेंचा मला सकाळी फोन आला. तेव्हा त्यांनी बंडखोरांना का सोबत घेताय, असा प्रश्न केला. शिंदेंना एखादं पद तुम्ही का देताय, असा सवालही त्यांनी केला. संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो, अशी ऑफर तेव्हा ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला, मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याचं मी ठाकरेंना सांगितलं. जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नाही, असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. 


दरम्यान नाशिकमध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे आणि भारती पवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. "नाशिककरांनी हा निर्धार केला आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी, नेते इतकं कडक ऊन असतानाही ऱॅलीत सहभागी झाले होते. त्यावरुन येणाऱ्या नाशिक आणि दिंडोरीत हेमंत गोडसे आणि भारती पवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. कारण गेल्या 10 वर्षात मोदींनी केलेलं काम हे 50 ते 60 वर्षं करता आलं नाही. या देशाला विकासाकडे नेण्याचं काम त्यांनी केलं आहे. तसंच महायुतीने 2 वर्षात केलेलं काम, विकास, सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय, योजना याची पोचपावती जनता देईल असा विश्वास आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


आम्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नाही. 24 तास आमचं काम सुरु असतं. महायुतीचे कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं, घऱी बसून किंवा फेसबुक लाईव्ह करुन काम करत नाहीत. त्यांचं काम सतत सुरु असतं असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आमचे कार्यकर्ते 24 तास काम करणारे, लोकांच्या मदतीला धावून जाणारे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे आहेत. आमचा विजय पक्का आहे. रॅलीत सहभागी होऊन लोकांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.