गडकरींची वचनपूर्ती! सावित्री नदीचा नवा पूल वाहतुकीसाठी खुला
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त सावित्री पुलाच्या शेजारीच नवीन पूल अवघ्या सहा महिन्यात बांधून पूर्ण झाला.
रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त सावित्री पुलाच्या शेजारीच नवीन पूल अवघ्या सहा महिन्यात बांधून पूर्ण झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पूल आज वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. गडकरी यांनी दिलेल्या वचनांची या निमित्ताने पूर्तता झाली आहे.
गेल्या वर्षी सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळला आणि कोकणवासियांसमोर मोठं संकट उभं ठाकलं. या अपघातात 40 निष्पांपाना आपला जीव गमवावा लागला.
6 ऑगस्ट 2016ला केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी अपघातग्रस्त पूलाचा पाहणी दौरा केला. त्याचवेळी त्यांनी 180 दिवसात आम्ही या पूलाचं बांधकाम पूर्ण करू, असं आश्वासन दिलं आणि अवघ्या 165 दिवसांत या पूलाचं काम पूर्ण होऊन तो वाहतूकीसाठी आजपासून खुला झाला आहे.
36 कोटी खर्चून हा पूल बांधण्यात आला असून, हा पूल इतर पूला पेक्षा जरा वेगळा आहे. ब्रिटीशकालीन पुलापेक्षा हा पूल 3 मीटर उंच असून या पुलाची उंची 13 मीटर आहे. या पुलाची लांबी 239 मीटर असून 16 मीटर रूंद हा पूल आहे. हा पूल तीनपदरी असून अवघ्या 165 दिवसात हा पूल बांधण्यात आलाय.
नव्यानं बांधण्यात आलेला हा पूल कोकणासाठी वरदान ठरेल. कारण, भविष्यात होणारं चौपदरीकरण डोळ्यासमोर ठेऊन हा पूल सावित्रीच्या नदीवर उभा केलाय.