मुंबई : महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आता, बुधवारी होणाऱ्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या धोरणांवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे सरकारची आज होणारी मंत्रिमंडळ म्हणूनच महत्त्वाची मानली जात आहे. शासकीय योजनेत एक व्यक्ती एक घर या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही व्यक्ती अथवा त्याच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेअंतर्गत राज्यात एकच घर देण्याची तरतूद यात असणार आहे. यापूर्वी घर वाटप झालं असेल तर यापुढे दुसरं घर वाटप होणार नाही असं या धोरणात असेल अशी शक्यता आहे. इमारती किंवा चाळीचा पुनर्विकास मूळ घराच्या बदल्यात मोफत किंवा सवलतीच्या दरात एक किंवा अनेक घरं मिळत असल्यास त्यांना या धोरणाचा प्रतिबंध होणार नाही हा त्यातील दिलासा असेल. 


पुनर्विकासात घरं मिळाल्यानंतर त्यांना अन्य कोणत्याही शासकीय योजनेत सदनिका मिळणार नाहीत. शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर असलेल्यांना शासनाच्या आणखी चांगल्या योजनेत किंवा सध्याच्या घरापेक्षा मोठे घर घ्यावयाचे असल्यास आधीचे घर शासनाच्या संबंधित प्राधिकरण किंवा संस्थेत दोन महिन्यात परत करणे अनिर्वाय असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेव्हा आता, या महत्त्वाच्या धोरणावर राज्य शासनाचा काय निर्णय़ होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आहे. 


विकासकामांना स्थगिती नाही


मेट्रो कारशेड वगळता इतर कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. उलटपक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी सरकारनं आढावा बैठक घेतली, ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच स्पष्ट केली. 



राज्यात सध्या सुरु असणारे प्रकल्प, त्यांची सद्यस्थिती, त्या प्रकल्पासाठी लागणारा खर्च या सऱ्याचा आढावा सरकारच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री उपस्थित होते.