मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख उद्योगपतींशी संवाद साधणार
उद्धव ठाकरे प्रथमच उद्योग क्षेत्रातल्या प्रमुख उद्योगपतींशी आज संवाद साधणार आहेत.
मुंबई : मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यावर उद्धव ठाकरे प्रथमच उद्योग क्षेत्रातल्या प्रमुख उद्योगपतींशी आज संवाद साधणार आहेत. राज्य सरकार आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्योग ठाकरे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित असतील. महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठीच्या धोरणावर यामाध्यमातून चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. राज्याच्या विकासाबाबतची आपली भूमिका मुख्यमंत्री उद्योगपतींसमोर मांडणार आहेत. आर्थिक क्षेत्रातली सध्याची स्थिती, आर्थिक विकासाबाबत महत्त्वाच्या क्षेत्रांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे उद्योगपतींकडून घेणार आहेत.
राज्याचा विकास आराखडा तयार करताना उद्योग क्षेत्रातल्या प्रमुखांच्या सूचनांचा योग्य विचार केला जाणार आहे. रतन टाटा, मुकेश अंबानी, यांच्यासह नामवंत उद्योगपती उपस्थित राहणार आहेत.