कणकवली : १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस सभा घेतील, आणि याच सभेत महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष भाजपमध्ये विलीन होईल, अशी घोषणा नारायण राणेंनी केली होती. पण नारायण राणेंच्या या घोषणेवर शिवसेनेने टीका केली आहे. मुख्यमंत्री कणकवलीमध्ये प्रचारसभा घेणार नसल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. जिथं शिवसेना आणि भाजपा आमनेसामने असतील तिथं मोठ्या नेत्यांनी प्रचारसभा घ्यायच्या नाहीत, असा करार झाल्याचं ते म्हणाले. राणेंनी सोडलेली ही पुडी असल्याचा टोला देसाईंनी लगावल्यामुळे मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. एका वर्षात स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलिन करण्याची घोषणा राणेंना करावी लागते, यापेक्षा मोठं दुर्दैव नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केलीय.


राणेंनी एक वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. पण वर्षभरातच त्यांना पक्ष गुंडाळावा लागत असल्याचा चिमटा वैभव नाईक यांनी काढला आहे. राणेंनी भाजपात विलिन होण्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवल्याचा टोलाही त्यांनी लगावला.